मंडळ हा काही बिझनेस किंवा व्यापार नाही. ही एक सामाजिक संस्था आहे. वर्गणी भरुन तुम्ही सदस्य होता तेव्हा बंगलोरात मराठी संस्कृती जतन करण्यास तुमचा हातभार लागतो. इथे नवीन ओळखी होतील, शोधले तर विविध व्यवसाय-उद्योगातील उच्चपदस्थ, समविचारी मित्र भेटू शकतील. मुलांच्या कानावर सध्या दुर्मिळ झालेली मातृभाषा पडेल. मंडळाच्या व्यासपीठावर, रंगमंचावर तुमच्या अंगचे कलागुण दाखवायची संधी लाभेल. कार्यकर्ता म्हणून सामील झालात तर तुमचे संघटना कौशल्य, नेतृत्वगुण, संभाषण पारंगतता, नेटवर्किंग कसब विकसित करता करता तुम्ही देखील ह्या आपल्या मराठी संस्थेच्या उपयोगी पडता तो दुतर्फी फायदा वेगळाच. मंडळात काम करताना पुष्कळ शिकायलाही मिळते, ज्याचा उपयोग कदाचित तुमच्या नोकरी-धंद्यातही होईल. ह्या अनमोल गोष्टी कुठल्याही मॉलमध्ये मिळत नाहीत, त्या तुम्हाला मंडळात मिळतात.
मंडळाला सर्वच कार्यक्रम तिकीट लावून करणं शक्य नसतं. आणि ते बरोबर वाटणारही नाही आपल्याला. मंडळात आपण बसवतो त्या गणपतीच्या दर्शनाला आपण तिकीट लावू शकतो का? लहान मुलांचे कार्यक्रम करतो तेव्हा त्याला तिकीट लावणे योग्य आहे का? वर्षभरातले कितीतरी कार्यक्रम इथे सर्वांना पैसे न भरता पाहता येतात. तुम्ही स्वत: ते सगळेच्या सगळे कार्यक्रम बघाल असं नाही. पण आपले भाषा बांधव, त्यांचे कुटुंबीय हे कार्यक्रम बघू शकत असतात ते तुमच्या वर्गणीमुळे! गेल्या काही वर्षात सभागृहांचा, कार्यक्रमांचा खर्च खूपच वाढला आहे. जाहिराती, प्रायोजक आणून हा खर्च आपण वेळोवेळी भागविला तरी कायमस्वरुपी दूरगामी पायाभूत उपक्रमांसाठी सभासदांचा पाठिंबा आवश्यक असतो. महाराष्ट्राबाहेर मराठी माणसाला हक्काचं माहेरपण मिळावं ह्यासाठी जे जे शक्य आहे त्यावर मंडळ खर्च करत असते.
महाराष्ट्र मंडळ वेळोवेळी घेते त्या अनेक स्पर्धांमध्ये सभासदांना सहसा विनामूल्य प्रवेश असतो. मंडळाचे सभागृह / वास्तूतील इतर जागा सदस्यांना भाड्याने देताना शुल्कात सवलत दिली जाते. मंडळाच्या ऑफलाइन तसेच ऑनलाईन प्रकाशनांत जाहिरात द्यायची झाली तरी सभासदांना काही सूट असते. शक्य होईल तेव्हा तेव्हा काही कार्यक्रमांची तिकीटेही सदस्यांना कमी दरात मिळतात.
खरं तर मराठी माणूस दक्षिणेत उतरला त्याला तीनशे वर्षे होऊन गेली. पण आधुनिक महाराष्ट्रीयांचे मंडळ बेंगळूरुत स्थापन होऊनसुद्धा तब्बल शंभर वर्षे झाली. शंभर वर्षे म्हणजे जवळजवळ चार पाच पिढ्या! सुरुवात झाली एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी जेव्हा महाराष्ट्रातून काही सर्व्हेयर इथे कामासाठी म्हणून आले. त्यांच्यापैकी कै. बापूराव जोशी आणि सहकाऱ्यांनी मंडळाची स्थापना केली. आपल्याकडे त्या वेळच्या पहिल्या सभेपासूनचा वृत्तांत अगदी लिखित स्वरूपात आहे. मंडळाची औपचारिक घटनाही आहे. संस्था नोंदणीकृत असून दरवर्षी ऑडिट होते आणि सर्व सभासदांची बैठक होऊन कार्यकारिणी निवडली जाते. मंडळाची स्वत:ची वास्तू शहरात अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे. सभासदांनी दिलेली वर्गणी आणि देणग्या यामुळेच मंडळाचे कार्य इतके वर्ष चालू शकले. म्हणून बंगलोरमध्ये राहणारे सगळे मराठी या संस्थेचे हितचिंतक असायला हवेत आणि आहेतच. तुम्हीही सामील व्हावे असे आम्हाला अगदी मनापासून वाटते.
© 2022 Maharashtra Mandal Bengaluru. All Rights Reserved.
Designed & Developed by: Thought Pickers