महाराष्ट्र निवास बिल्डिंग ट्रस्ट

१९२० साली महाराष्ट्र मंडळाची स्थापना झाल्यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी, या संस्थेची स्वतःची वास्तू असावी या उद्देशाने १९४० साली मंडळाने गांधीनगर मध्ये साधारण १०००० चौ. फूट जागा विकत घेतली. त्यावर टप्प्याटप्प्याने बांधकाम झाले. १९४४ साली पहिली इमारत उभी राहिली. १९५६ सालापर्यंत आणखीही बांधकाम केले गेले. इमारतीची देखरेख करण्याचे काम हे मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यापेक्षा खूपच वेगळे होते. त्यासाठी त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्ती असल्यास अधिक योग्य होईल असे वाटल्याने वेगळे विश्वस्त मंडळ (महाराष्ट्र निवास बिल्डिंग ट्रस्ट ) स्थापन करावे असा निर्णय झाला. त्यावेळी डॉ. गोवर्धन यांची विश्वस्त मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली. रवी किर्लोस्कर आणि इंदुताई किर्लोस्कर यांनीही chairperson म्हणून विश्वस्त मंडळावर अनेक वर्षे काम केले. तसेच ब. दा. मराठे यांनी सचिव आणि खजिनदार पदाची जबाबदारी अनेक वर्षे वाहिली. मुळगुंद यांनी अनेक वर्षे व्यवस्थापक म्हणून ट्रस्टचे कामकाज सांभाळले.

१९९२ मध्ये अभय दीक्षित यांनी त्यावेळच्या chairperson इंदुताई किर्लोस्कर यांना पत्र लिहून, नवीन विश्वस्त निवडताना ते मंडळाशी संलग्न असावेत असे सुचविले. त्यावर्षी पद्माकर जावडेकर व प्रभाकर टोळ यांची विश्वस्त पदावर निवड झाली. १ जानेवारी १९९६ रोजी अभय दीक्षित यांची विश्वस्त म्हणून निवड झाली. १९९७ मध्ये पद्माकर जावडेकर यांनी chairperson आणि प्रभाकर टोळ यांनी vice chairperson म्हणून पदभार स्वीकारला. अभय दीक्षित सचिव/खजिनदार झाले. खऱ्या अर्थाने ट्रस्टची जबाबदारी पुढल्या पिढीकडे गेली. या काळात ट्रस्टची आर्थिक स्थिती सुधारून, कार्यपद्धतीत काळानुसार बदल केले गेले.

नंतर शशी दिवाकर आणि सुरेश उदास हे विश्वस्त झाल्यावर इमारतीच्या नूतनीकरणाने वेग घेतला. पाण्याची टाकी, दरवाजा, कार्यालय, ग्रंथालय, उपाहारगृह वगैरेचे नूतनीकरण झाले. कुटीरचे नूतनीकरण केले, त्यासुमारास शांताबाई जोशी, नरेंद्र गवाणकर, किशोर दिवेकर, सुधीर तांबे, अनील बोकील ह्या जेष्ठ सभासदांबरोबरच पुरुषोत्तम मुजुमदार, ज्योती साठे, संजय मईंद, अजित एदलाबादकर, स्नेहा केतकर ही त्यापुढची पिढीही ट्रस्टवर आली. विनायक कवठेकरही काही वर्षांनी ट्रस्टमध्ये सामील झाले . ह्यातील बहुतेकांनी मंडळाच्या कार्यकारिणीवर अनेक वर्षे काम केले होते.

गेल्या काही वर्षात विश्वस्त मंडळाने BESCOM कडून विजेचा पुरवठा वाढवून घेणे, नवीन ध्वनी - प्रकाश योजनेची उपकरणे, खोल्यात नवीन furniture, पंखे, LED tube lights, लिफ्ट, CCTV, Air flow system बसविणे, वगैरे सारख्या अनेक सुधारणा केल्या. मंडळाच्या कार्यकारिणीबरोबर अधिक जवळीक साधण्यासाठी कार्यकारिणीवरील (अध्यक्ष, उपाध्यक्षांशिवाय ) इतर सभासदांनाही ट्रस्टच्या प्रत्येक सभेसाठी आमंत्रित करण्याचा पायंडा सुरु केला.

शताब्दी वर्षाच्या निमित्ताने दोन्ही मजल्यांवरील प्रसाधनगृहांचे नूतनीकरण आणि संपूर्ण इमारतीचे रंगकाम पूर्ण झाले. इमारतीच्या नूतनीकरणाचे कामही विचाराधीन आहे.